महाराष्ट्र (Maharashtra) :- राज्यातील धरणसाठा आता 38.95 टक्क्यांवर आलाय. पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोकण, विदर्भातील सर्व मोठ्या धरणांचा पाणीसाठा आता झपाट्यानं खाली घसरलाय. एकीकडे तापमानाच्या झळा आणि दुसरीकडे पाणीटंचाई अशा दुहेरी कात्रीत राज्यातील बहुतांश भागातील नागरिक सापडले आहेत. अकोल्यात पाणी चोरीला जाऊ नये म्हणून पाण्याच्या टाक्यांना कुलूप लावले जात आहेत. मराठवाड्यात 10-12 दिवसांनी एकदा नळाला पाणी येतानाचे चित्र पुन्हा सुरु झाले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याच्या नियोजनावरून नागरिकांमध्ये रोष दिसून येत आहे.
महाराष्ट्राच्या सहा महसूल विभागांपैकी पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या तीन विभागातील धरणांमध्ये आता 40 टक्क्यांहूनही कमी पाणी शिल्लक आहे. पुणे विभागात राज्यातील सर्वात कमी पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत काही टक्क्यांनी पाणीसाठा अधिक असला तरी काही प्रमुख धरणे एप्रीलमध्यावरच मायनसच्या दिशेने वाटचाल करू लागली आहेत. त्यामुळे शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी याच सुमारास पाणीसाठा 33.62% एवढा होता. तो यंदा 38.95% एवढाच राहिलाय.
विभाग गतवर्षीचा जलसाठा यंदाचा जलसाठा
पुणे 29.51% 32.70%
छ. संभाजीनगर 17.06% 38.77%
नाशिक 37.41% 42.64%
कोकण 47.68% 48.41%
नागपूर 44.89% 39.27%
अमरावती 48.45% 48.96%