राज्याचे मराठी भाषा मंत्री आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते उदय सामंत यांनी आज पुन्हा एकदा मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thakrey) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. २२ फेब्रुवारी रोजी दोन्ही नेत्यांची शेवटची भेट झाली होती. आजच्या भेटीनंतर उदय सामंत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सदर भेटीमागचे कारण स्पष्ट केले. मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळे काही विषयांवर चर्चा करण्यासाठी राज ठाकरेंनी निमंत्रण दिले होते. त्यानुसार आज त्यांच्याशी चर्चा केली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांची परवानगी घेऊनच मी इथे चर्चेसाठी आलो आहे, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रात विविध बँका किंवा सार्वजनिक संस्थात मराठीसंबंधी विषय पुढे येत आहेत. त्याचा प्रतिबंध कसा करायचा? याबद्दल राज ठाकरेंनी काही सूचना आम्हाला दिल्या. या सूचनांबद्दल मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री (Devendra fadanvis) एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे. सद्यपरिस्थितीत कशी सुधारणा करता येईल, याचा प्रयत्न केला जाईल, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.