देवेंद्र फडणवीस – गडचिरोली, एकनाथ शिंदे मुंबई, अजित पवार- बीड, बावनकुळे – नागपूर
मुंबई (Mumbai):- महायुती सरकारने अखेर राज्यातील ३७ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी घोषित केली आहे. या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपेक्षेप्रमाणे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहराचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पालकमंत्र्यांच्या यादीतील सर्वात महत्वाची बाब म्हणजे, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा पालकमंत्रीपदाच्या यादीतून पत्ता कट करण्यात आला आहे. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदापासून मुंडे यांना वगळून खुद्द अजित पवार यांनी ही जबाबदारी आपल्याकडे घेतली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deverndra fadnavis) यांच्या नागपूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बावनकुळे यांच्याकडे अमरावती जिल्ह्याचेही पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. विदर्भातील वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी हसन मुश्रीफ यांची तर यवतमाळच्या पालकमंत्रीपदी संजय राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. अशोक ऊईके – चंद्रपूर, संजय सावकारे – भंडारा, आकाश फुंडकर – अकोला, मकरंद जाधव पाटील – बुलढाणा, बाबासाहेब पाटील – गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री असणार आहेत.