नागपूर (Nagpur) 02 जानेवारी :- भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील सुकळी गावानजीक बुधवारी मध्यरात्रीनंतर झाला. आर्यन हुकुमचंद पालीवाल (23) आणि सुमित राहुल सिरसाट (17, महाजनवाडी, हिंगणा) अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर अरमान रविंद्र मडामे (17, महाजनवाडी, गदाम लेआऊट) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन पालीवाल हा त्याचे मित्र सुमित सिरसाट आणि अरमान मडामे यांच्यासह बुधवारी रात्री 10.30 वाजता जेवण करण्यासाठी ढाब्यावर गेला. जेवण केल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास तिघेही दुचाकीने परत हिंगण्याकडे येत होते. ग्रीन वेलवेट लॉनच्यासमोर सुकळी गुपचूप गावाकडे जाणाऱ्या रोडवरुन जात असताना समोरुन येणाऱ्या (वाहन क्र. जीजे 37 टी- 7914) भरधाव ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत आर्यन पालीवाल आणि सुमित सिरसाट हे दोघेही रस्त्याच्या मधोपध पडले तर तिसरा मित्र अरमान मडामे हा रस्त्याच्या कडेला फेकल्या गेला.रस्त्यावर पडलेल्या आर्यनच्या छातीवरुन ट्रकचे चाक गेले तर सुमितच्याही अंगावरुन चाक गेले. तिघेही गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडून होते. ट्रकचालकाने घटनास्थळावर ट्रक उभा करुन पळ काढला. काही वेळानंतर मागून येणाऱ्या एका दुचाकीचालकाला अपघात दिसला. त्याने हिंगणा पोलीस ठाण्याला फोन केला. हिंगण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीतेंद्र बोबडे हे ताफ्यासह घटनास्थळावर पोहचले. त्यांनी रुग्णवाहिकेने आर्यन पालीवाल आणि सुमित सिरसाट या दोघांना एम्स रुग्णालयात दाखल केले तर अरमान मडामे याला हिंगण्यातील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. आर्यनचा छातीवरुन ट्रकचे चाक गेल्यामुळे त्याचा एम्स रुग्णालयाच्या रस्त्यातच मृत्यू झाला.
सुमित सिरसाट याच्यावर तातडीने उपचार सुरु होते. त्याचा आज. गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अरमानवर सध्या उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी हुकुमचंद बलराम पालीवाल यांच्या तक्रारीवरुन ट्रकचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला. ट्रकचालक मोइन जुम्माभाई इंगोरा (25, रा. तरसई गाव, ता. जामजोधपूर जि. जामनगर-गुजरात) याला अटक केली आहे.