पणजी (Panaji) 16 डिसेंबर :- । गोवा मुक्तिलढ्यात शहीद झालेल्यांपैकी १४ जणांच्या पहिल्या (हयात असणाऱ्या) वारसांचा राज्य सरकारच्या वतीने ६३ व्या मुक्तिदिनाचे औचित्य साधून प्रत्येकी १० लाख रुपये आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.१८ डिसेंबर रोजी विधानसभेत हा सन्मान सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
१८ डिसेंबर रोजी विधानसभेच्या पीएसी सभागृहात सकाळी ११ वा. १५ शहिदांच्या पहिल्या वारसांचा सन्मान करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. १५ पैकी कर्नेल सिंग बेनिपाल यांच्या कुटुंबीयांना २७ सप्टेंबर २०२२ रोजी मुख्यमंत्र्यांनी स्वतः घरी जाऊन १० लाखांचा धनादेश सुपूर्द केला आहे. उर्वरित १४ जणांचा प्रत्येकी दहा लाख रुपये आणि प्रमाणपत्र देऊन विधानसभेत सन्मान केला जाणार आहे. मुख्यमंत्री निवासात रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकार १९ डिसेंबर रोजी ६३ वा मुक्तिदिन साजरा करणार आहे. त्यानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांचा गौरव करण्यात येत होता; परंतु ज्यांनी हौतात्म्य पत्करले, त्यांच्या कुटुंबीयांची स्थिती बिकट असल्याचे निदर्शनास आले. त्यांना मदतीचा हात द्यावा, या उद्देशाने सरकारने हे पाऊल उचलले आहे.
स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरी देण्याची ४० जणांची यादी राहिली आहे. एकाच कुटुंबातील दोन-तीन जणांना नोकऱ्या दिल्या गेल्या आहेत. स्वातंत्र्यसैनिकांच्या जागा रिक्त होताच त्यांना त्या दिल्या जातील. स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांच्या नोकरीचे धोरण व्यवस्थित नव्हते. त्यामुळे एक-एक जणाने तीन नोकऱ्या स्वीकारल्या होत्या. मी मुख्यमंत्री झाल्यावर या धोरणात बदल केला आणि एकदा नोकरी स्वीकारल्यानंतर त्याला दुसरी नोकरी स्वीकारता येणार नाही, असे धोरण राबविले, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.