पीडब्ल्यूडी घेणार तक्रारींची दखल
अमरावती (Amravati) 26 ऑगस्ट :- सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणारे राज्यमार्ग आणि प्रमुख मार्गांवरील खड्ड्याच्या तक्रारी नोंदवण्यासाठी अँड्रॉइड ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींच्या आधारे मार्गांवरील खड्डे बुजवले जाणार आहेत.
विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यांवर मोठ – मोठे खड्डे पडण्याचे प्रमाण वाढते. खड्डे बुजवण्याच्या मागणीसाठी नागरिकांना आपल्या तक्रारी घेऊन संबंधित खात्याच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. दरम्यान, राज्यमार्ग आणि प्रमुख मार्गांवरील खड्ड्यांची माहिती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अँड्रॉइड ॲप (Android app) तयार करण्यात आले आहे. या ॲपवर नागरिकांना रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात घरबसल्या आपल्या तक्रारी नोंदवता येणार आहेत.
ॲपवरून मिळालेल्या माहितीच्या आधारे आमच्या विभागाकडून तक्रारींचे निराकरण करण्यात येईल आणि खड्डे मुक्ती योजना राबवण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता जगन दांदडे यांनी दिली. यापुढे रस्त्यांवरील खड्ड्यांची माहिती देण्यासाठी किंवा तक्रारी करण्यासाठी नागरिकांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात येण्याची गरज राहणार नाही, असेही दांदडे म्हणाले. ॲपवरून प्राप्त होणाऱ्या तक्रारींबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येईल आणि संबंधित राज्यमार्ग व जिल्हा मार्गावरील खड्डे बुजवण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.या ॲपमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कामही सोपे झाले आणि नागरिकांनाही या बाबत तक्रार करण्यासाठी सोपा पर्याय मिळाला आहे.