अनिल देशमुखांचे माझ्याकडे ऑडिओ-व्हिडिओ पुरावे
देवेंद्र फडणवीस यांचा स्पष्ट इशारा
राज्यात माझ्यावर टीका करण्यासाठी काही सुपारीबाज तयार झाले असून ते सुपारी घेऊन आपल्यावर आरोप करतात, श्याम मानव हे त्यांच्या नादी लागलेत का हे पाहावं लागेल, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे . अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना तत्कालिन जळगावचे एसपी प्रविण मुंढे यांना धमकी दिल्याचा धक्कादायक अहवाल सीबीआयने दिला आहे. याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी आणखी काही धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. अनिल देशमुख यांचे ऑडिओ आणि व्हिज्युअल आपल्याकडे असल्याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ‘अनिल देशमुख यांच्यावर आरोप लागल्यानंतर आमचं सरकार नव्हतं. महाविकासआघाडी सरकार होतं, ती केस मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टीस समोर लागली, मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टीस अनिल देशमुखां विरोधात एफआयआर करायला लावला, त्यांच्या सरकारमध्ये तो एफआयआर झाला त्यानंतर जे जेलमध्ये गेले आणि आता ते बेलवर बाहेर आहेत. ते सुटलेले नाहीत. १०० कोटीच्या वसुलीमध्ये ते बेलवर बाहेर आले आहेत’, असे फडणवीस म्हणाले आहेत.
———
देशातले पहिले हळद संशोधन केंद्र ‘वसमत’ येथे
मुख्यमंत्र्यांनी केला 800 कोटींचा निधी मंजूर
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून हळदीला असलेली मागणी लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहन दिले पाहीजे. त्यासाठी हळद लागवडीचे ‘क्लस्टर’ पद्धतीन उत्पादन करण्यात यावे असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. देशातले पहिले हळद संशोधन केंद्र ‘वसमत’ येथे होत आहे, हळद उत्पादनामुळे मराठवाडा, विदर्भ सारख्या दुष्काळग्रस्त भागात हळदीच्या उत्पादनाने सुवर्णक्रांती होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
——
अजित पवारांचा मंत्र्यांना निधी देण्यास नकार
महायुतीत नाराजी नाट्य
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. एकीकडे राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी महायुतीच्या तीनही घटक पक्षांमध्ये नाराजीनाट्य रंगल्याचे बघायला मिळत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीनही पक्षांच्या काही मंत्र्यांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार यांनी निधी देण्यास नकार दिल्यामुळे महायुतीत नाराजी नाट्य रंगल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत तीन महिने बाकी असताना महायुतीच्या घटकपक्षांमध्ये सुरु असलेल्या या घडामोडी महायुती सरकारसाठी घातक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
———
पूर्व विदर्भात पावसाचे थैमान!
अनेक गावांचा तुटला संपर्क
गेल्या काही दिवसापासून उपराजधानी नागपूरसह पूर्व विदर्भात सुरू असलेल्या धुव्वाधार पावसाने सर्वत्र एकाच दाणादाण उडवली आहे.तर पूर्व विदर्भात अतिवृष्टी सदृश्य पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं असून शहरातील रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झालं आहे.दरम्यान, काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा नागपूरसह विदर्भातील बहुतांश ठिकाणी पावसाची जोरदार रिपरिप सुरू आहे.परिणामी अनेक नदी नाले ओसंडून वाहू लागल्याने अनेक नदी नाल्याच्या काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सोबत अनेक गावांची मुख्य शहरांशी संपर्क तुटल्याची माहिती आता समोर येऊ लागली आहे.
——–
मुंबई पोलिसांची मोठी कारवाई!
दोन कोटीचे अंमली पदार्थ जप्त
मुंबई पोलिसांच्या कारवाईला मोठे यश आले आहे. पोलिसांनी वसई विरार पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी विभागाने एक भारतीय इसम आणि विदेशी महिला कडून दोन कोटीहून अधिकचे अंमली पदार्थ जप्त केलं आहे. अंमली पदार्थविरोधी कारवाईत पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केली आहे. काशिगाव या ठिकाणी ही कारवाई केली असून यात एक भारतीय पुरुष आणि एक विदेशी महिला असे दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी त्यांच्या कडे तब्बल 2 कोटी 18 लाख रुपये किमंतीचा 1 किलो 90 ग्रॅम एम.डी. हा अंमली पदार्थ मिळाला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आणखी काही गुप्त माहिती समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
———-
NDRF चे जवान बनले देवदूत
पाण्यातून काढली वाट
विदर्भातील गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातही काही नद्यांना पूर आला आहे. याच पुराच्या पाण्यात एनडीआरएफचे जवान अनेकांसाठी देवदूत बनल्यासारखे मदतीला धावून येत आहेत. गरोदर असलेल्या कलावती (वय 20) ह्या मूळच्या आशिफाबाद, राज्य तेलंगणा येथील असून मौजा, चिक्याला, ता. सिरोंचा येथे नातेवाईकांकडे वास्तव्यास आल्या होत्या. या दरम्यान, एकीकडे पाऊस सुरू असताना रात्री पोटात दुखायला लागल्याने स्थानिक महसूल/आरोग्य पथकाने वेळीच परसेवाडा येथील PHC टेकडा येथे भरती केले.या महिलेस रुग्णालयात नेण्यासाठी पाण्यातून मार्ग काढावा लागला. त्यावेळी, एनडीआरएफच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले.