चंद्रपूर(Chandrapur) 17 जुलै :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ऋतुराज सुर्या, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे, नियोजन समितीचे सदस्य डॉ. मंगेश गुलवाडे उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, राज्यात मुख्यमंत्री (Eknath Shinde) युवा कार्य प्रशिक्षण योजना नुकतीच जाहीर झाली आहे. या योजनेंतर्गत शासनामार्फत शैक्षणिक अर्हता 12 वी पास करीता प्रतिमाह विद्यावेतन 6 हजार रुपये, आय.टी.आय/पदविका करीता प्रतिमहा 8 हजार रुपये तर पदवीधर/पदव्युत्तर करीता प्रतिमहा 10 हजार याप्रमाणे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा विद्यावेतन जमा करण्यात येईल. त्यामुळे या योजनेचा लाभ सर्वांपर्यंत पोहचवावा. तसेच जिल्हयातील सर्व उमेदवारांनी व आस्थापनांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी गौडा यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, शासन निर्णयाचे सादरीकरण सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले.