बीड २८ जून :- ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि आबासाहेब वाघमारे यांनी सुरू केलेली अभिवादन यात्रा आता स्थगित झाली आहे. दरम्यान, ५ जुलैपासून पुन्हा पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला ते सुरूवात करणार आहेत. प्रकृती अस्वस्थामुळे हा दौरा स्थगित केला आहे, असे लक्ष्मण हाके यांचे सहकारी प्राध्यापक पी.टी. चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
ही यात्रा काल (गुरुवार) बीड जिल्ह्यात पोहोचली. बीडमध्ये पोहोचल्यानंतर परळी गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर पहाटे लक्ष्मण हाके आणि ओबीसी बांधव हे भगवान गडावर पोहोचले. तेथे पोहोचल्यानंतर भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन या ठिकाणी घेतले. त्यानंतर आज पासूनचा पुढचा जो दौरा रद्द करण्यात आलेला आहे.
दरम्यान, २९ जूनला ओबीसी आंदोलक हे सरकार सोबत चर्चा करण्यासाठी मुंबईला भेटणार आहेत. त्यानंतर पुन्हा पश्चिम महाराष्ट्रातील जो काही उर्वरित दौरा असेल त्याला सुरुवात होईल, असेही चव्हाण यांनी सांगितले.