मर्णिकर्णिका घाटावर झाले अंत्यसंस्कार
वाराणसी 22 जून :- अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे प्रमुख आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते गंभीर आजाराने त्रस्त होते. प्राणप्रतिष्ठा आयोजित करणाऱ्या पुजाऱ्यांच्या संघात लक्ष्मीकांत दीक्षित यांचा समावेश होता. त्यांच्यावर मर्णिकर्णिका घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री (Chief Minister) योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेवेळी लक्ष्मीकांत दीक्षित यांची मुख्य पुजारी म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांच्या पूर्वजांनी नागपूर व नाशिक या संस्थानांतही धार्मिक विधी केले. लक्ष्मीकांत दीक्षित हे उपासनेच्या पद्धतीचे तज्ञ होते आणि मीरघाट, वाराणसी येथे असलेल्या सांगवेद महाविद्यालयाचे वरिष्ठ आचार्य होते. मीरघाट येथील सांगवेद महाविद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक लक्ष्मीकांत दीक्षित यांची वाराणसीच्या विद्वानांमध्ये गणना होते. काशीतील यजुर्वेदाच्या तज्ञांमध्ये त्यांची गणना होते.
शुक्ल यजुर्वेदाचे सर्वोच्च अभ्यासक वेदमूर्ती लक्ष्मीकांत मथुरानाथ दीक्षित यांचा जन्म १९४२ मध्ये मुरादाबाद (उत्तर प्रदेश) येथे झाला होता. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी आणि वडिलांचे नाव वेदमूर्ती मथुरानाथ दीक्षित होते. लक्ष्मीकांत दीक्षित यांनी त्यांचे काका गणेश दीक्षित भट्ट यांच्याकडून वेद आणि विधींची दीक्षा घेतली होती. नेपाळ व्यतिरिक्त भारतातील अनेक शहरांमध्ये आचार्य म्हणून त्यांनी वैदिक विधींमध्ये भाग घेतला. त्यांना वेदसम्राट, वैदिक भूषण, वैदिकरत्न, देवी अहिल्याबाई राष्ट्रीय पुरस्कार असे पुरस्कार मिळाले आहेत. लक्ष्मीकांत दीक्षित यांचे पुत्र सुनील दीक्षित यांनी सांगितले की, त्यांच्या पूर्वजांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला होता.
पंतप्रधानांनी चरणस्पर्श करून घेतले होते आशीर्वाद
लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली १२१ पंडितांच्या पथकाने अयोध्या विधी पार पाडले. काशीतील ४० हून अधिक विद्वान होते, जे १६ जानेवारीपासून प्राणप्रतिष्ठेच्या विधीत सहभागी झाले होते. प्राणप्रतिष्ठेनंतर मुख्य पुजारी आणि आचार्य पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना रक्षासूत्र बांधले. पंतप्रधानांनी लक्ष्मीकांत दीक्षित यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले.