नागपूरच्या सोनेगाव पोलीस ठाण्यांतर्गत एक खळबळजनक घटना उजेडात आली आहे. यात नागपूरच्या मनीष नगर लेआऊट मधील स्वावलंबी नगरमध्ये भीषण अपघात घडला असून यात एका दीड वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यु झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली असून संपूर्ण परिसर या अपघताने हादरला आहे. यात या चिमुकल्याची आई घरातील कामात व्यस्त असताना घराच्या अंगणात खेळणाऱ्या दीड वर्षाच्या मुलाचा अचानक तोल गेला आणि तो अंगणातील विहिरीत पडला. बराच वेळ होऊन मुलगा दिसत नसल्याने शोधा शोध केल्यानंतर उशीरा तो विहिरीत पडल्याची बाब समोर आली.
परिणामी, विहरीत बुडून या बाळाचा मृत्यू झालाय. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेने मात्र संपूर्ण परिसरामध्ये शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.