नवी दिल्ली (New Delhi)21 जून:- केंद्रीय जल आयोगाच्या नुकत्याच आलेल्या अहवालात चिंताजनक आकडेवारी पुढे आलीय. अहवालानुसार देशातील 150 मुख्य जलाशयांमध्ये केवळ 21 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
देशातील कडाक्याच्या उन्हामुळे लोकांना घाम सुटला असतानाच पाण्याचे स्रोतही आटले आहेत. केंद्रीय जल आयोगाच्या नुकत्याच आलेल्या अहवालात याबाबत आकडेवारी समोर आली आहे. जल आयोगाच्या अहवालानुसार देशातील 150 मुख्य जलाशयांमध्ये केवळ 21 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जलविद्युत प्रकल्प आणि पाणीपुरवठ्यासाठी अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या, या जलाशयांची एकत्रित साठवण क्षमता 178.784 अब्ज घनमीटर (बीसीएम) आहे, जी देशाच्या एकूण पाणी साठवण क्षमतेच्या 69.35 टक्के आहे. या जलाशयांमध्ये गुरुवारपर्यंत उपलब्ध साठा 37.662 बीसीएम होता, जो त्यांच्या एकूण क्षमतेच्या 21 टक्के आहे. एकूणच, 150 जलाशयांमध्ये 54.310 बीसीएम एवढा जिवंत साठा उपलब्ध आहे, ज्याची एकूण क्षमता 257.812 बीसीएम आहे. हा आकडा गेल्या वर्षीच्या आकडेवारीपेक्षा कमी आहे. केंद्रीय जल आयोगाच्या अहवालात असे म्हटले आहे की, जलाशयांमध्ये सध्याचा साठा गेल्या दहा वर्षांच्या सरासरी साठ्यापेक्षा कमी आहे. पहिल्या दोन आठवड्यात जलाशयांमधील एकूण जलसाठा सुमारे 22 टक्के होता, तर एक आठवड्यापूर्वी तो 23 टक्के होता.
आयोगाच्या अहवालानुसार, उत्तर आणि पूर्व भारतातील कडाक्याच्या उष्णतेमुळे दिल्लीसह देशातील अनेक भागात जलसंकट दिसून येत आहे. जलाशयांमधील पाणीसाठा पाहिल्यास दक्षिण भारतातील राज्यांवर त्याचा खोलवर परिणाम झाला आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये सध्या असलेल्या 42 जलाशयांची एकूण क्षमता 53.334 बीसीएम आहे. केंद्रीय जल आयोगाच्या अहवालानुसार या जलाशयांमध्ये उपलब्ध साठा आता 8.508 बीसीएम इतका आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 21 टक्के कमी आहे. उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजस्थानमधील एकूण 10 जलाशयांमध्ये एकूण 19.663 बीसीएम पाणी साठवण क्षमता आहे. केंद्रीय जल आयोगाच्या अहवालानुसार या जलाशयांमध्ये सध्याचा पाणीसाठा 5.488 बीसीएम आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 39 टक्क्यांनी कमी आहे. तसेच आसाम, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, नागालँड आणि बिहारमधील 23 जलाशयांची एकूण साठवण क्षमता 20.430 बीसीएम आहे. या जलाशयांमध्ये सध्याचा पाणीसाठा 3.873 बीसीएम आहे, जो एकूण क्षमतेच्या 19 टक्के आहे. मात्र, या 23 जलाशयातील पाणीसाठ्यात गेल्या वर्षीच्या 18 टक्क्यांच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.
भारतातील पश्चिमेकडील राज्य, गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये एकूण 49 जलाशय आहेत. त्यांची पाणी साठवण क्षमता 17.130 बीसीएम आहे. या 49 जलाशयांमध्ये सध्याचा पाणीसाठा 7.608 बीसीएम आहे. हा जलसाठा गेल्या वर्षीच्या 24 टक्क्यांच्या तुलनेत 20.49 टक्क्यांवर आला आहे. त्याचप्रमाणे, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सध्या असलेल्या 26 जलाशयांची एकूण पाणी साठवण क्षमता 48.227 बीसीएम आहे. सद्यस्थितीबाबत बोलायचे झाल्यास या 26 जलाशयांमध्ये 12.185 बीसीएम पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या 32 टक्क्यांच्या तुलनेत हा साठा 25 टक्क्यांवर आला आहे. केंद्रीय जल आयोगाच्या अहवालानुसार देशातील सर्व जलाशयांच्या पाणीसाठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे.