सोलापूर , 2 जुलै :- आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना विठुरायाच्या प्रसाद म्हणून अल्पावधीत अतिशय लोकप्रिय झालेल्या बुंदीच्या लाडूला भाविकांतून असलेली मागणी पाहून या वर्षी मंदिर समितीने 11 लाख लाडू बनवण्यास सुरुवात केली आहे . यंदा विक्रमी आषाढी यात्रा भरण्याचे संकेत पाहता गरज पडल्यास आणखी 5 लाख लाडू बनविण्याची तयारी केल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांपासून विठुरायाच्या प्रसाद म्हणून हा बुंदीचा लाडू भाविक यात्रेनंतर आपल्या गावाकडे घेऊन जात असतो. तसे पाहता विठुरायाच्या भक्तांना आषाढी यात्रा ही दिवाळीपेक्षा वेगळी नसते आणि त्यामुळेच मंदिर समितीच्या लाडू प्रसादाला भाविकांतून मोठी मागणी असते. आपल्या लाडक्या विठुरायाच्या सर्वोच्च उत्सव असलेल्या या यात्रेत हे लाडू प्रसाद म्हणून सोबत गावाकडे घेऊन जायची प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून येथे रूढ झाली आहे . मात्र या यात्रा काळात 15 ते 20 लाख भाविक येत असल्याने या लाडू प्रसादाच्या विक्रीला मर्यादा होत्या.