महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा अक्षरश: धुव्वा उडाला आहे. तर महायुतीने 288 पैकी 230 जागांवर मजल मारत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय. काँग्रेसमधील पराभूत उमेदवारांनी आपल्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांवर आरोप केले आहेत. या पराभूत आमदारांनी आपल्या पराभवाचं खापर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर फोडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे नागपूर मध्य मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी तर उघडपणे नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे नागपूर मध्य मतदारसंघाचे उमेदवार बंटी शेळके यांनी अतिशय गंभीर आरोप केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आरएसएसचं काम करत आहेत, अशी टीका बंटी शेळके यांनी केली. माझा पराभव माझ्याच काँग्रेसने केला, असं बंटी शेळके यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस अध्यक्षांसह INDIA ब्लॉकचे अनेक दिग्गज नेते उपस्थित
28 नोव्हेंबर 2024 रोजी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. हा समारंभ रांचीच्या मोरहाबादी मैदानावर झाला, जिथे राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी त्यांना शपथ दिली. हेमंत सोरेन यांनी चौथ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे, आणि हा पहिला प्रसंग आहे जेव्हा झारखंडमध्ये एका सरकारने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा सत्ता घेतली आहे. या शपथग्रहण समारंभात इंडिया ब्लॉकचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते, ज्यात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा आणि केसी वेणुगोपाल यांचाही समावेश होता. हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वात झारखंड मुक्ति मोर्चा (जेएमएम) च्या नेतृत्वाखालील आघाडीने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली.
भाजपच्या ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य
महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार? याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांना आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असे वाटत आहे. दरम्यान, या मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचे नेते प्रविण दरेकरयांनी मोठं वक्तव्य केलं आहे. काळजी करायचं काही कारणचं नाही, कारण, राज्याचं नेतृत्व करायची संधी देवेंद्र फडणवीस यांना मिळणार असल्याचे दरेकर म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे आपल्या मागे उभे राहतात असंही ते म्हणाले
भाजपमधून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हेच राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा शिवसेना शिंदे गटानं व्यक्त केली आहे. तर याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
——————————————-
जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी संध्याकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.0 इतकी मोजली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमावर्ती भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि, त्याचे केंद्र जमिनीपासून 209 किमी अंतरावर असल्याने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.
——
दिल्लीत आपला नक्की विजय होईल : प्रफुल पटेल
अजित पवार राष्ट्रवादीच्या दिल्ली कार्यलायत कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिल्ली विधानसभा निवडणुका लढवण्याचे संकेत मिळाले आहेत. राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी दिल्ली विधानसभा निवडणुका लढवायच्या आहेत. दिल्लीत आपला नक्की विजय होईल, असा विश्वास प्रफुल पटेल यांनी कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना व्यक्त केला. तसेच राष्ट्रीय पक्षाचा गेलेला दर्जा या निवडणुकीत आपण पुन्हा मिळवू, असंही पटेल यांनी स्पष्ट केलं. विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर दादांचं दिल्ली कार्यालयात वाजतगाजत स्वागत करण्यात आलं. दादांसोबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित होते.
—————
संसदेच्या अधिवेशनात ‘इंडी’ आघाडी अडचणीत
TMC कडून काँग्रेसची खरडपट्टी
संसदेचं अधिवेशन सुरु असतानाच विरोधी पक्षांमधील मतभेद उघड झाले आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जनतेशी निगडीत मुद्यांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं तृणमूल काँग्रेसनं स्पष्ट केलंय. संसदेचं अधिवेशनात फक्त अदाणी समुहाच्या मुद्यावरच केंद्रीत राहू नये, असं मत पक्षानं व्यक्त केलंय.